छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सिटी चौक पोलिसांनी रविवारी (दि. २९) शहागंज, रंगारगल्ली भागातील तीन दुकानांवर छापे टाकून सुमारे ६० हजारांचे पाकिस्तानी उत्पादने जप्त केली. याप्रकरणी ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीन व्यापाप्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहम्मद अबरार मोहम्मद मसुयोद्दीन (२६, रा. नवाबपुरा), अंकुर अजय अग्रवाल (३५, रा. शहागंज) आणि जुमान खान मोहम्मद हनिफ खान (४८, रा. शहाबाजार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.तिघांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सोमवारी (दि.३०) दिली. दुकानांतून साबणासह २८ प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात काही व्यापारी बेकायदेशीररीत्या कोणत्याही बिलाशिवाय पाकिस्तानी क्रीम्स आणि साबणांची विक्री करत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकार्यांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह पीएसआय संजय राठोड, मुनीर पठाण, आनंद बाहूळ, प्रवीण टेकले, मनोहर त्रिभुवन, मंगेश पंडित यांच्या पथकाने रविवारी (दि. २९) तीन दुकानांवर छापे टाकून पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने गोरी, मल्लिका, गोल्डन पर्ल, चांदनी, फेस फ्रेश आणि नूर हर्बल यांसारख्या बंदी असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.










